मुंबई/पुणे : पूर्व उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे येत्या रविवारी १८ फेब्रुवारी राेजी आयाेजन करण्यात आले आहे. राज्यातील ६ हजार १८३ परीक्षा केंद्रांवर राज्यातील सुमारे १ लाख शाळांमधील पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक या दाेन्ही शिष्यवृत्तीसाठी एकूण ८ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
गुणवान विद्यार्थ्यांचा शाेध घेत त्यांना प्राेत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची याेजना महाराष्ट्र राज्य शासनाने १९५४-५५ पासून सुरू केली आहे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे १६ हजार ६८३ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६ हजार २५८ संच मंजूर आहेत. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांकरिता आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दाेन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते.
सद्य:स्थितीत ए ते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता संचनिहाय किमान २५० ते कमाल एक हजार रुपये प्रतिवर्ष तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीकरिता संचनिहाय किमान ३०० ते दीड हजार प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येत हाेती. त्यामध्ये २०२४ परीक्षेपासून पूर्व उच्च प्राथमिकसाठी प्रतिवर्ष ५ हजार तर पूर्व माध्यमिकसाठी साडेसात हजार एवढी वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयाेजन केले जाते.