‘मराठीतील देखणा अभिनेता’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै २०२३ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं. रवींद्र महाजनी करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना एक अभिनेत्री त्यांच्यावर फिदा होती आणि ती पाठलाग करायची, असा किस्सा माधवी महाजनी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात सांगितला आहे.
माधवी महाजनींनी लिहिलंय, “रवीबरोबर एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री त्याच्यावर फिदा होती. ती माझ्या घरी फोन करायची. घरातला नोकर फोन घेत असे. त्याच्याकडून रवी कोणत्या शहरात शूटिंग करतोय याची माहिती घ्यायची. त्याप्रमाणे ती त्याच्या हॉटेलमध्ये जायची. हे रवीला कळले की तो मला फोन करायचा. ‘हिला कोणी सांगितलं मी इथे आहे म्हणून’? असं विचारायचा. मग म्हणायचा ‘आता मी काय करू? माझ्या रूममध्ये जाऊन बसली असणार ती’. कधी तो तिला टाळण्यात यशस्वी व्हायचा. कधी रुममध्ये गेल्यावर त्याला कळायचं, ती मग तिथे त्याच्याबरोबरच राहायची.”