राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले
छत्रपती संभाजीनगरनंतर मुंबईतील मालवणी भागातही काही प्रसंग घडला. यावरून या दोन्ही ठिकाणी राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे. दोन्ही घटनेला धार्मिक स्वरूप आहे का असे वाटायला लागले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. यावर, शरद पवार यांनी चिंता व्यक्त करू नये. त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते
बोलताना संयम असावा. कुणाचीही मन दुखावली जातील, असे बोलायला नको असे मला वाटते. पवारांनी चिंता व्यक्त केली. सरकार त्यांचे राहिलेले नाही. त्यांचे सरकार असताना लोकांना जास्त चिंतीत टाकले होते. चिंताग्रस्त लोक होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
गेली अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला
निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेली अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण प्रगत झाला. आजचा विषय आंब्याच्या ब्रँडिंगचा आहे. आजकाल कृषी विद्यापीठ आहेत. मात्र आंबा कसा पिकवावा, बायप्रॉडक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही, अशी खंत नारायण राणे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आंबा आपण तसा आहे तसा विकतो. त्याचे व्हॅल्यू अॅडेड प्रॉडक्ट करत नाही. कोकणी माणसाने बायप्रॉडक्टचे ज्ञान कधी घेतले नाही. हे शिका ना. कर्ज कर्ज कधीपर्यंत बोलणार? कर्ज हा प्रश्न एका दिवसात सुटेल. मात्र कायम स्वरुपी मार्ग हवा माझ्याकडे या. मी सर्व मदत करतो. एकदाच चांगला मार्ग काढू. सर्व मदत करतो. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटतो. एक पॅकेज जाहीर करायला लावतो, अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली.